
आय फ्लू होण्याचं कारण काय आहे – सध्या मुंबईत आणि एकूणच देशात ‘आय फ्लू’ची साथ पसरू लागली आहे. आय फ्लू म्हणजेच एक प्रकारे डोळे येणे. साधारणपणे दरवर्षी पावसाळ्यात डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात पसरते. पावसाळ्याव्यतिरिक्त वातावरणात होणारे बदल, वाढलेली आर्द्रता यामुळे ही साथ झपाट्याने पसरताना दिसते. डोळे येणे म्हणजेच आय फ्लूमध्ये डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागात जळजळ जाणवते. हवेतील वाढलेली ह्युमिडिटी/आर्द्रता हे एक कारण आहेच पण पावसाळ्यात दूषित पाणी हे देखील तितकंच आय फ्लू होण्याचं कारण आहे.
आय फ्लूची लक्षणं
१) डोळे दुखणे
२) डोळ्यांची आग होणे
३) डोळे लाल होणे
४) डोळ्यातून सतत पाणी येणे
५) डोळ्यांच्या पापण्या चिकट होणे किंवा डोळ्यातून चिकट द्राव येणे
६) कधीकधी अंधुक दिसणं
आय फ्लू कसा पसरतो ?
१) ज्या व्यक्तीला आय फ्लू झाला आहे त्याचा टॉवेल इत्यादी गोष्टी वापरण्याने
२) अशुद्ध पाण्याचा हात डोळ्याला लागणे
हा आजार होऊ नये म्हणून किंवा झाल्यास काय काळजी घ्यावी?
१) आय फ्लू झाला असल्यास स्वच्छ तलम कपड्याने डोळे स्वच्छ धुवावेत
२) वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावेत
३) डोळे स्वच्छ पाण्याने धुवत राहावेत
४) मुळातच कोणीही कोणाचं आयलायनर इत्यादी वापरू नये पण आयफ्ल्यूची साथ असेपर्यंत तर टाळावं, कोणाचाही गॉगल वापरू नये
५) डोळ्याला सारखा हात लावू नये
६) कम्युटर, टीव्ही स्क्रीनपासून शक्यतो दूर रहावं
वर सांगितलेली कोणीतही लक्षणं आढळल्यास कोणताही घरगुती उपचार न करता तात्काळ डोळ्यांच्या डॉक्टरांना डोळे दाखवावेत.