
चष्मा वापरायला आवडत नाही म्हणून कॉन्टॅक्ट लेन्सेसचा वापर करण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरण्याचं मुख्य कारण हे एकतर चष्मा वापरायचा कंटाळा किंवा त्रास हे असतं, किंवा चष्मा वापरायची काहीशी लाज वाटणे हे असतं. कॉन्टॅक्ट लेन्सेस हा या सगळ्यावर मात करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. पण कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरताना काही महत्वाच्या बाबींची काळजी घेतली नाही तर मात्र डोळ्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरताना काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी.
१) कॉन्टॅक्ट लेन्स वापरायची असल्यास त्या व्यक्तीचं वय कमीत कमी १८ वर्षांचं हवं, त्यापेक्षा लहान वयातल्या व्यक्तींनी कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्याचा हट्ट करू नये, ते त्यांच्याच डोळ्यांसाठी धोक्याचं ठरेल
२) कॉन्टॅक्ट लेन्स ही डोळ्यात सेट करताना डोळ्याशी लेन्सचा संबंध येत असल्यामुळे एकूणच हायजिन किंवा स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यायला हवं.
३) डोळ्यात लेन्स सरकवताना हात साबणाने स्वच्छ धुवावेत. हात स्वच्छ धुतलेले नसतील तर हातावरील जंतूंचा संसर्ग डोळ्यांना होण्याची शक्यता आहे
४) डोळ्यात लेन्स सरकवल्यावर ती दिवसभर डोळ्यात असते, आणि ही लेन्स ही बाह्य आणि प्लास्टिक वस्तू असल्यामुळे लेन्सची स्वच्छता अतिशय महत्वाची आहे
५) लेन्स स्वच्छ करण्यासाठी चांगल्या दर्जाचं क्लिनिंग सोल्युशन वापरायला हवं हे विसरू नका. दरवेळी लेन्स साफ करताना नवीन क्लिनिंग सोल्युशन वापरा.
६) तुमचा लेन्सचा बॉक्स पण स्वच्छ राखणं तितकंच आवश्यक आहे. हा बॉक्स वरचेवर साबण आणि टूथब्रशने चांगला घासून स्वच्छ ठेवत जा. कारण हा बॉक्स जरासुद्धा अस्वच्छ राहिला तर डोळ्यांना थेट इन्फेक्शन होण्याचा धोका आहे
७) १२ तासांच्या वर शक्यतो डोळ्यात लेन्सेस ठेवू नका
८) सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोपताना डोळ्यात लेन्सेस ठेवून झोपू नका
९) प्रत्येक लेन्स किती आठवडे/महिना वापरावी ह्याची सूचना तुमच्या लेन्सबॉक्सवर असते, त्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्याचं पालन करा. थोडक्यात जर लेन्स एक महिनाच वापरावी अशी सूचना असेल तर ती तितकाच काळ वापरा
१०) लेन्स वर्षानुवर्षे वापरल्यामुळे डोळ्यांना ऍलर्जीचा संसर्ग होण्याचा धोका असतो, अशा वेळेस एकदा वापरून फेकून देता येतील अशा लेन्सेस वापरणं कधीही चांगलं
११) विविध रंगी लेन्सेसचा वापर फक्त तात्पुरता करावा आणि त्यात सुद्धा त्या लेन्सची क्वालिटी उत्तम दर्जाची असायला हवी. ह्या रंगीत लेन्सेसवर वापरलं जाणारं पिगमेंटेशन डोळ्यांना घातक ठरू शकतं.
१२) कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायच्या असतील तर त्या तज्ज्ञांकडून डोळ्यांच नीट माप घेऊन त्यांनी सुचवलेल्या मापाच्या लेन्सेसचं वापराव्यात. स्वतःच्या मतांनी कोणत्याही लेन्सेस वापरू नयेत
१३) लेन्स वापरणाऱ्यानी हाताच्या बोटांची नखं कायम व्यवस्थित कापावीत आणि ती स्वच्छ देखील ठेवावीत. कारण डोळ्यात लेन्स सरकवताना डोळ्यांना वाढलेल्या नखांमुळे इजा होऊ शकते