
डोळ्यातून पाणी येण्याचा त्रास जाणवतो – डोळ्यांची अचानक जळजळ सुरु होणे, डोळ्यातून पाणी वाहायला लागणं ह्यासारख्या समस्यांचा अनुभव अनेकांनी घेतलेला असतो. अशा समस्यांवर काहीतरी घरगुती उपाय करून लोकांना कधी कधी आराम मिळतो त्यामुळे मग डॉक्टरकडे न जाताच लोकं पुन्हा कामाला सुरु करतात. पण आम्ही ह्या लेखमालेत जे नेहमी सांगत आलो आहेत तेच पुन्हा सांगतो की डोळ्यांची जळजळ होणं किंवा डोळ्यातून पाणी येणं ह्यासारख्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता, डॉक्टरांना जरूर डोळे दाखवून घ्या. पण मुळात डोळ्यांतून पाणी वहायला लागण्याची कारणं काय असू शकतात.
१) तुम्ही मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीच्या स्क्रीनकडे खूप दीर्घकाळ बघितल्यास डोळ्यांवर ताण येऊन त्यातून पाणी येऊ शकते
२) एखादा शाम्पू किंवा फेसवॉश किंवा साबण ज्याची तुम्हाला सवय नाही त्याच्या वापराने केमिकल रिऍक्शन येऊन डोळ्यातून पाणी येऊ शकतं
३) अनेकदा कडाक्याच्या थंडीची सवय नसेल किंवा प्रखर उन्हाने देखील डोळ्यातून पाणी येणं किंवा लाल होणं होऊ शकतं
४) हवेतील प्रदूषण हे खूप महत्वाचं कारण आहे. किंवा तुम्ही दुचाकीवरून प्रवास करत असाल तर हवेतील एखादा घटक डोळ्यांना स्पर्श करून गेला तरी डोळे लाल होऊन त्यांतून पाणी यायला सुरुवात होऊ शकते
५) घरातील पाळीव प्राण्यांचे केस इत्यादी डोळ्यात जाऊन देखील हा त्रास होऊ शकतो
७) एखाद्या पदार्थाची ऍलर्जी येऊन देखील हा त्रास होऊ शकतो
८) अनेकदा तान्ह्या बाळाच्या केसमध्ये पण डोळ्यातून पाणी येण्याचा त्रास जाणवतो. ह्यात डोळे आणि नाकाला जोडणाऱ्या नलिकेची योग्य वाढ झालेली नाही हे कारण असू शकतं. अशावेळेला बाळाच्या डोळ्यांची ६ महिन्यापर्यंत निगराणी केली जाते. साधारणतः ६ महिन्यात ही समस्या आपोआप मिटते पण कधी कधी तरीही नाही झाल्यास एक छोटी सर्जरी करावी लागते ज्याला इंग्रजीत NASO LACRIMAL DUCT OBSTRUCTION असं म्हणतात
९) हल्ली ५,६ वर्षापासूनच जसा शाळेचा अभ्यास वाढायला लागतो तसं चष्मा लागण्याचं प्रमाण वाढायला लागलं आहे. त्यामुळे तुमच्या मुलाच्या डोळ्यातून सारखं पाणी वाहत असेल तर त्याला चष्मा आला असण्याची शक्यता आहे हे समजून त्याचे डोळे तपासून घ्यावेत.
१०) कधी एखादा बाहेरचा घटक डोळ्यात अडकतो. अशावेळेस डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागतं. ह्याबाबतीत चुकून पण घरी उपचार करू नयेत, तात्काळ डॉक्टरची भेट घ्यावी
११) ह्याचं अजून एक कारण आहे ज्याला नासूर असं म्हणतात. ह्यात डोळ्यांबरोबरच नाकातून देखील पाणी वाहत राहतं. अशी लक्षणं आढळल्यास मात्र डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या
१२) आणि कधी अति आनंदाने किंवा अतिदुःखाने डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात. ह्या जर काही काळाने थांबल्या तर ठीक अन्यथा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
थोडक्यात डोळे लाल होणे किंवा त्यातून पाणी वाहणं ह्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या