
डोळ्याभोवती कोलेस्ट्रॉलचा थर – काही लोकांच्या डोळ्याभोवती आपण, मुख्यतः डोळ्यांच्या पापण्यांच्या जवळ त्वचेवर पिवळ्या रंगाचा एक थर दिसतो. हा एक प्रकारचा आजार आहे ह्याला इंग्रजीत xanthelasma असं म्हणतात, आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डोळ्याभोवती कोलेस्ट्रॉलचा थर जमा होतो. हा थर जरी डोळ्यांसाठी फारसा गंभीर नसला तरी हा तुमच्या शरीरात काही अनियमितता (irregularities ) असल्याचं दाखवतं.
हा थर जमा होण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे
१) शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप वाढणं
२) कधी अनियंत्रित डायबेटीस हे देखील कारण असू शकतं
३) किंवा थायरॉईडची समस्या उदभवल्यास देखील डोळ्याभोवती असा पिवळा थर जमा होऊ शकतो.
डोळ्याभोवती जमा होणारा थर हा तीन प्रकारचा असू शकतो
१) अगदी सपाट म्हणजेच फ्लॅट
२) किंचित नाजूक पण घट्ट
३) किंवा त्याने किंचित इरिटेशन होत आहे असा
वर म्हणलं तसं शरीरातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं हे ह्या आजाराचं मुख्य कारण आहे. पण वाढलेलं वजन हे देखील ह्याचं महत्वाचं कारण ठरू शकतं. तसंच अति सिगरेट पिणाऱ्यांमध्ये देखील हा थर जमा होऊ शकतो.
हा थर जमा झाल्यास काय करावं. हा थर कोणत्याही घरगुती उपायांनी जाणं शक्य नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या फॅमिली डॉक्टरची भेट घेऊन त्यांच्याकडून प्राथमिक तपासणी करून घ्यावी. मग तुमचे लिपिड प्रोफाइल टेस्ट करून शरीरात कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड लेव्हल्स किती आहेत ते देखील तपासून घ्या. ह्यातून हा थर xanthelasma चाच आहे का हे तर निश्चित होईलच, पण त्याचवेळेस कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईडमुळे शरीरात अजून काही गंभीर आजार तर उत्पन्न झालेला नाही ना ह्याची चाचपणी होईल.
पुढे एकदा ह्याचं अचूक निदान झालं की डॉक्टरांच्या सल्ल्याने ह्याची सर्जरी केली जाते. ह्यासाठी सर्जरीचे चार प्रकार आहेत
१) क्रायोथेरपी
२) लेसर सर्जरी
३) ट्रॅडिशनल किंवा नेहमी केली जाते तशी सर्जरी ज्यात हा भाग कापला जातो
४) किंवा इलेक्ट्रिक नीडल सर्जरी
xanthelasma चं स्वरूप काय आहे ह्यावरून कोणती सर्जरी करावी हे डॉक्टर ठरवतात. सर्जरी झाल्यावर हलका एखादा मार्क शिल्लक राहण्याची शक्यता देखील असते.
पण वर म्हणलं त्या प्रमाणे शक्यतो कोणतेही घरगुती उपाय करू नका. डॉक्टरांचाच सल्ला घ्या. आणि हो ज्या कारणामुळे हा आजार होऊ शकतो ते म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड पातळी वाढणं. ह्यासाठी
१) योग्य व्यायाम
२) योग्य आहार
३) पुरेशी झोप
४) धूम्रपान आणि अल्कोहोल शक्यतो टाळणं हे मुख्य पथ्य पाळा, म्हणजे तुम्हाला कधीच xanthelasma चा त्रास होणार नाही.