
मला अगदी नेहमी विचारला जाणारा प्रश्न असतो, ‘डॉक्टर दारूचा डोळ्यावर काही परिणाम होतो का ?’. मी हो असं उत्तर दिलं की रुग्ण थोडंसं अविश्वासाने माझ्याकडे बघतो. पण मी त्यांना जेंव्हा ठामपणाने सांगतो की कुठलीही सवय तिचा अतिरेक झाला, मग ते दारू पिणं का असेना त्याचा डोळ्यावर परिणाम होणारच. मी ह्या आधीच्या लेखांमध्ये एक गोष्ट वारंवार सांगत आलो आहे डोळ्यांचं आरोग्य आणि एकूण आरोग्य हे वेगळं करता येणार नाही, त्याचप्रमाणे एकूण शरीरावर परिणाम करणाऱ्या सवयी ह्या डोळ्यांच्या आरोग्यावर पण परिणाम करतात. त्यामुळे दारूचं अतिरिक्त सेवन ही एक त्यातली सवय.
कधीतरी दारू पिण्याचे शरीरावर दीर्घकालीन परिणाम होत नाहीत. पण अर्थात कधीतरी जरी दारू प्यायली तरी त्याने अनेकांना एखाद दिवस डोके दुखणे किंवा थोडंसं धूसर दिसणं हे त्रास होऊ शकतातच. त्यामुळे कधीतरी दारू पिणाऱ्यांना पण त्रास होतच नाही असं नाही, अर्थात त्याचं प्रमाण कमी असतं.
पण दीर्घकाळ आणि नियमित दारू पिणाऱ्यांच्या शरीरावर अगदी १००% गंभीर परिणाम होतात आणि डोळे शरीराचाच भाग असल्यामुळे डोळ्यावर देखील परिणाम होतो. तो खालील प्रमाणे
१) वाढत्या वयात डोळ्यांची क्षमता कमी होते पण नियमित दारू पिणाऱ्यांच्या बाबतीत ती क्षमता अधिक वेगाने घसरते.
२) डायबेटिक रेटिनोपॅथी होण्याची शक्यता सर्वाधिक असते
३) retinal vein occlusion हा असा एक डोळ्यांचा आजार आहे ह्यात रेटिनामध्ये ब्लॉक तयार होतो त्यामुळे रेटिनाला होणाऱ्या रक्त पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.
४) नियमित दारूचं सेवन हे उच्चरक्तदाब आमंत्रण ठरू शकतं आणि उच्च रक्तदाब हे डोळ्याला अतिशय वाईट आहे हे उघडच आहे
५) ह्या विषयी अजून पुरेसे निष्कर्ष आलेले नाहीत पण नियमित दारूचं सेवन करणाऱ्यांना लहान वयात मोतीबिंदु होण्याची शक्यता अधिक असते. अर्थात ह्याबद्दल अजून पुरेसा अभ्यास समोर आलेला नाही. पण तरीही ही शक्यता नाकारता येत नाही.
मग तुम्ही विचाराल की काळजी काय घ्यावी. अगदी सोप्या गोष्टी पाळा
१) दारू नियमित अजिबात पिऊ नका. पंधरा दिवस ते महिन्यातून एकदा अतिशय माफक प्रमाणात सेवन करा
२) कोणाच्याही आग्रहाला बळी पडू नका
३) आपल्याला किती दारू सोसते ह्याचा अंदाज घ्या आणि तितकीच दारू प्या आणि ती देखील कधीतरी
इतकं केलंत तर दारूच्या दुष्परिणामांपासून तुमचे डोळे नक्की बचावतील.