नेत्रदान करतात म्हणजे नक्की काय

नेत्रदान करतात म्हणजे नक्की काय
Eye Donation

नेत्रदान करतात म्हणजे नक्की काय – आपल्या देशात नेत्रहिनांच प्रमाण मोठं आहे. आज देशात नेत्रहिनांच प्रमाण ८० लाखांच्या वर असेल असा एक अंदाज आहे. कॉर्नियाल अंधत्व हे मुख्य कारण असतं. पण मुळात कॉर्नियाला अंधत्व म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. कॉर्निया हा डोळ्याचा सगळ्यात पुढचा थर आहे, हा थर पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट असतो. हा जो थर म्हणजेच कॉर्नियातील दोषांमुळे अंधत्व येऊ शकतं; कधी दृष्टी कमजोर होते तर कधी दृष्टी पूर्ण जाते. कॉर्नियातील दोष ज्या शस्त्रक्रियेने दूर करता येतो, त्या शस्त्रक्रियेला कॉर्निया ट्रान्सप्लांट असं म्हणतात. ह्या सर्जरीमध्ये एखाद्या दात्याचा कॉर्निया, अंध व्यक्तीच्या कॉर्नियाच्या जागी बसवला जातो आणि अंध व्यक्तीला दृष्टी प्राप्त होते. थोडक्यात नेत्रदान होतं म्हणजे जो डोनर असतो त्याच्या डोळ्यातील कॉर्नियाचा भाग काढला जातो आणि जो एक चुकीचा समज आहे डोनरचा आख्खा डोळा काढून नेला जातो हा चुकीचा समज आहे.

भारतात १९४७ साली डॉ. आर. ई.एस . मुथय्या यांनी देशातील पहिली कॉर्निया बँक सुरु केली आणि त्यांनीच देशातील पहिलं यशस्वी कॉर्निया ट्रान्सप्लांटेशन केलं. जगातील पहिली आय बँक सुरु झाली १९४४ साली आणि त्यानंतर भारतात अवघ्या काही वर्षांत अस्सल भारतीय आयबँक सुरु झाली. आज आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत नोंदणीकृत अशा ७४० आयबॅंक्स आहेत. आत्तापर्यंत २०१७-१८ या वर्षांत सगळ्यात जास्त म्हणजे ७१७०० नेत्रदान झाले. पण यावरून हे लक्षात घ्यावं लागेल की देशात नेत्रदात्यांचं प्रमाण किती कमी आहे. दर ७० गरजूंपैकी फक्त एका व्यक्तीलाच नेत्रदानाचा फायदा होऊ शकतो, इतकं नेत्रदान कमी आहे.

आपल्याकडे नेत्रदानाविषयी काही पौराणिक संदर्भ देखील सापडतात. तेलगू पुराणकथांनुसार कणप्पा नावाचा शिकारी ज्याची भगवान शंकरावर अतूट श्रद्धा असते आणि या भक्तीपोटी तो स्वतःचा एक डोळा शंकरानाअर्पण करतो आणि तो दुसरा डोळा काढून अर्पण करणार इतक्यात शंकर प्रसन्न होतात.

जगातील पहिलं यशस्वी आय इम्प्लांट झालं १९०५ साली आणि ते केलं डॉ. एडवर्ड झर्म यांनी, पण नेत्रदानासाठी एक चळवळ सुरु करून त्यातून जगातील पहिली आयबँक तयार व्हायला १९४४ साल उजाडावं लागलं. भारतात १९४७ साली पहिलं कॉर्निया ट्रान्सप्लांटेशन झालं पण त्यानंतर १९६० ला इंदोरमध्ये आणि त्याच आसपास अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात या शस्त्रक्रिया यशस्वी होऊ लागल्या.

जगात सगळ्यात जास्त नेत्रदान हे श्रीलंकेत होतं. श्रीलंकेतील बहुसंख्यांच्या मान्यतेनुसार या जन्मात जर मी नेत्रदान केलं तर पुढच्या जन्मात तुम्हाला उत्तम दृष्टी मिळू शकते, यामुळे श्रीलंकेतून जगाला कॉर्नियाचा पुरवठा केला जातो. १९६४ साली जेंव्हा जगात अनेक ठिकाणी कॉर्निया इम्प्लांटच्या शस्त्रक्रिया होत नव्हत्या तेंव्हा हडसन सिल्वा यांनी कॉर्निया सिंगापूरला पाठवला.

आज जगात नेत्रदानाबद्दल जागरूकता निर्माण व्हायला लागली आहे. २००८ ला एका अमेरिकन वृत्तपत्रात सीरियातील तत्कालीन धार्मिक नेतृत्वाने कसं स्वतः नेत्रदानाचा निर्णय घेत या चळवळीला चालना दिली अशी बातमी केली होती.

आज भारतात नेत्रदानविषयी जागरूकता वाढत असली तरी ती पुरेशी नाही. अनेक सुप्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींनी नेत्रदानाचा स्वेच्छेने निर्णय घेतला आहे. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन, सलमान खान, रणदीप हुडा, सुनील शेट्टी, जया बच्चन, रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट ह्यांनी स्वेच्छेने नेत्रदानाचा निर्णय घेतला आहे.
ह्या लेखाच्या शेवटी मी सगळ्यांना एकच विनंती करेन की नेत्रदान हे खरंच श्रेष्ठदान आहे. त्यामुळे ह्यासाठी लोकांनी अधिक सकारात्मकता दाखवावी. जर काही शंका असतील तर जरूर तज्ज्ञ डॉक्टरांना भेटावं, त्यांच्याकडून नेत्रदान करतात म्हणजे नक्की काय होतं हे समजून घ्यावं आणि नेत्रदानाचा जरूर निर्णय घ्यावा. तुमच्या ह्या निर्णयामुळे एखाद्या व्यक्तीला हे जग अनुभवता येऊ शकतं हे कायम डोक्यात ठेवावं. २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा आहे. आत्ता सर्वत्र उत्सवाचं वातावरण आहे, ह्या वातावरणातच नेत्रदानाचा जरूर संकल्प करा.

Welcome to your new showit blog ! this is your very first blog post. Changes in health insurance plans for senior citizens : insurers are adopting new policies. ai solutions tailored to.