
पावसाळा हा ऋतू अनेकांना आवडतो, कारण एकतर रखरखीत उन्हापासून सुटका मिळालेली असते, त्यात पुन्हा सर्वत्र हिरवंगार झालं असल्यामुळे पिकनिकला जाण्याचा मूड बनत असतो. पण या सगळ्यात पाऊस हा अनेक आजारांना सुद्धा घेऊन येत असतो, आणि त्यांची योग्य काळजी नाही घेतली तर हे आजार त्रासदायक ठरू शकतात. पण आज आपण पावसाळ्यात डोळ्यांचे कोणते आजार होऊ शकतात आणि या ऋतूमध्ये कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरणाऱ्यानी काय काळजी घ्यावी याबदल बोलणार आहोत.
पावसाळ्यात होणारे पाच सामान्य प्रकारचे डोळ्यांचे संसर्ग
डोळे लाल होणे (Pink Eye): या संसर्गामुळे डोळ्यांना लालसरपणा, खाज सुटणे, पाण्यासारखा स्त्राव आणि डोळे चुरचुरत असल्याचे जाणवणे. ज्यांना अशा प्रकारचा संसर्ग झाला आहे त्यांच्यामुळे इतरांना देखील संसर्ग होऊ शकतो.
जीवाणूजन्य संसर्ग (Bacterial Conjunctivitis) : जीवाणू संसर्गामुळे डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागात आग होत आहे असं वाटतं.
स्टाय (Stye): तेल ग्रंथींच्या जीवाणू संसर्गामुळे पापणीवर वेदनादायक लाल फोड येतो. ते थोडे मोठे झाल्यास सूज येते.
डोळे कोरडे पडणे :- पावसाळ्यात डोळे कोरडे पडण्याचं प्रमाण अधिक असू शकतं.
यामुळे डोळ्यांची खालीलप्रमाणे काळजी घ्या
हाताची स्वच्छता : आपले हात साबण आणि पाण्याने वारंवार धुवा, विशेषत: डोळ्यांना स्पर्श करण्यापूर्वी. जंतूंचा प्रसार रोखण्यासाठी डोळे चोळणे टाळा. आणि तुम्ही जर कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असाल तर मात्र अधिकच काळजी घ्या कारण अस्वच्छ हाताने कॉन्टॅक्ट लेन्सेस हाताळल्या तर त्याचा संसर्ग अधिक होऊन डोळ्यांना इन्फेक्शन होऊ शकतं.
लेन्सेसची स्वच्छता :- पावसाळ्यात लेन्सेस बाहेरील हवेतील जंतू जाऊन बसण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शक्यतो लेन्सेस वारंवार काढून त्या स्वच्छ करून, पुन्हा स्वच्छ हात धुवून त्या डोळ्यात घाला.
गॉगल किंवा संरक्षणात्मक चष्मा घाला :- पावसाळ्यात डोळ्यावर गॉगल किंवा संरक्षणात्मक गॉगल का घालावा असा तुम्हाला प्रश्न पडू शकतो. पण पावसाळ्यात अचानक येणाऱ्या वाऱ्यामुळे डोळ्यात धुळीचे कण उडून जाणे, डोळ्यात कुठूनतरी पाणी पडणे असे प्रकार होऊ शकतात. अशावेळेस डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यात तुम्ही जर लेन्सेस घालत असाल तर मात्र तुम्ही गॉगल किंवा संरक्षणात्मक चष्मा घालायलाच हवा.
शक्यतो लेन्सेस टाळा :- तुम्ही खूप पावसात बाहेर जात असाल किंवा कुठे पावसात पिकनिकला जात असाल तर शक्यतो लेन्सेस घालणं टाळा.
कोणाचाही टॉवेल, रुमाल, गॉगल वापरू नका :- पावसाळयात डोळ्यांचे इन्फेक्शनचे आजार वाढतात त्यामुळे शक्यतो कोणाचाही चष्मा किंवा गॉगल घालण्याचे टाळा आणि इतरांनी वापरलेला टॉवेल रुमाल अजिबात वापरू नका.
ही काळजी जर तुम्ही घेतलीत तर तुमच्या डोळ्यांचे आरोग्य छान राहील आणि तुम्ही पावसाळ्याचा आनंद घेऊ शकाल.