
बिंज वॉच’ ह्या शब्दाबद्दल तुम्ही ऐकलं आहे का ? नाही ? कदाचित तुम्ही ह्या शब्दाबद्दल ऐकलं नसेल पण ही शक्यता खूप मोठी आहे की तुम्ही स्वतः, ‘बिंज वॉच’ केलं असेल. बरं तुम्हाला ह्या शब्दाचा अगदी डिक्शनरी मधला अर्थ समजवून सांगण्यापेक्षा ‘बिंज वॉच’ म्हणजे नक्की काय हे सांगतो.
एखाद्या ओटीटीवर, एखाद्या तुमच्या आवडत्या सिरीजचा नवीन सिझन आला आहे, मग दिवसभर किंवा रात्री बसून त्याचे सगळे एपिसोड्स एकदाच बघून संपवले. मग त्यासाठी कळत-नकळत तुम्ही ८, ८ तास स्क्रीनसमोर बसलेले असता.
तुम्ही एखादा गेम खेळत असता आणि त्यात इतके बिझी होऊन जाता की त्यात ३,४ तास कसे आणि कधी गेले कळलेच नाही.
एखाद्याशी फोनवर बोलताना तुम्ही हेडफोन्स लावले आहेत. तुमचं बोलणं चांगलं दोन तीन तास लांबतं पण त्या दरम्यान तुम्ही स्क्रीनवर काही ना काही चेक करत बसता.
कोणाशीतरी सहज म्हणून अनेक तास मोबाईलवर चॅट करत करत अनेक तास तुमची नजर स्क्रीनला खिळलेली आहे.
ह्यातलं एक तरी तुमच्याकडून घडलं आहे? जर उत्तर ‘हो’, असं असेल तर तुमच्याकडून नकळतपणे ‘बिंज वॉच’ झालं आहे. कदाचित तुमच्या बाबतीत हे नकळत झालं असेल, पण अनेक लोकं अगदी अभिमानाने सांगतात की आम्ही सर्रास ‘बिंज वॉच’ करतो, म्हणजे काय तर तासनतास स्क्रीनला आमची नजर खिळलेली असते.
मी एक डॉक्टर म्हणून सांगेन की ही अतिशय वाईट सवय आहे आणि तुमच्या डोळ्यांचं आरोग्य तुम्ही स्वतःच्या हाताने बिघडवत आहात.
‘बिंज वॉच’चे तुमच्या डोळ्यावर नक्की काय काय परिणाम होतात हे पहिले समजून घेऊया
१) ह्यात सातत्याने तुमची नजर अनेक तास सलग स्क्रीनवर खिळल्यामुळे तुमचे डोळे कोरडे होतात, त्यावर अतिरिक्त ताण येतो आणि ते दुखायला लागतात. ही खूण असते की तुमचे डोळे आता बसं असं सांगत असतात.
२) ‘बिंज वॉच’चा दुसरा परिणाम शरीरावर होतो तो म्हणजे तुमची झोप पुरेशी आणि योग्य वेळेला होत नाही ज्याचा थेट परिणाम डोळ्यावर होतो
३) तुमचं बिंज वॉचिंगचं प्रमाण जर खूपच वाढलं तर मात्र तुमची दृष्टी अधू होऊन तुम्हाला चष्मा लावायला लागू शकतो
ह्यावर उपाय काय असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर माझं पहिलं उत्तर आहे की खूप काळ स्क्रीनकडे बघणं टाळा. पण तरीही तुम्हाला जर त्याशिवाय पर्याय दिसत नसेलच तर मात्र खालील गोष्टी जरूर करा
१) सलग २० मिनिटाच्या वर स्क्रीनकडे बघू नका. दर वीस मिनिटांनी थांबून, २ मिनिटं डोळे शांतपणे मिटून बसून रहा.
२) स्क्रीनकडे बघताना सुद्धा पापण्यांची उघडझाप होत आहे ना हे जरूर पहा
३) समजा एखाद्या दिवशी तुमच्याकडून सलग काही तास स्क्रीनकडे बघणं झालं तर दुसऱ्या दिवशी स्क्रीनपासून पूर्ण लांब रहा
४) जेंव्हा तुम्ही बिंज वॉचिंग करत असाल तेंव्हा मध्ये मध्ये डोळे थंड पाण्याने धुवा
५) डॉक्टरांच्या सल्ल्याने एखादं औषध डोळ्यात घाला किंवा दुसऱ्या दिवशी डोळ्यावर थंड दुधाच्या किंवा पाण्याच्या घड्या ठेवा
६) स्क्रीनकडे बघताना स्क्रीनच्या लाईटपासून बचाव करणारा चष्मा लावा
७) बिंज वॉचिंग केलंच तर दुसऱ्या दिवशी पुरेशी झोप घ्या आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य राहील ह्याची काळजी घ्या
लक्षात ठेवा की बिंज वॉचिंग हे कितीही छान वाटलं तरी त्याचे डोळे, शरीराचे इतर भाग आणि मनावर होणारे परिणाम गंभीर आहेत.