शेतकऱयांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यायची

Eyecare for Farmers

१ जुलै हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या योगदानाबद्दल हा दिवस साजरा केला जातो. आत्ता नुकताच मृग नक्षत्र येऊन गेलं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आता हळूहळू मान्सूनचा पाऊस पोहचायला सुरुवात होईल आणि सर्वत्र पेरणीचा हंगाम सुरु होईल. शेतकरी हा जगाचा अन्नदाता असतो, पण या अन्नदात्याच्याच आरोग्याची अनेकदा हेळसांड होते.

या अन्नदात्याने आत्ता शेतीच्या पेरणी असो की पुढे येणारी कापणी या काळात स्वतःच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी यावर चर्चा करणारा हा लेख.

१) ऊन, पाऊस की थंडी शेतकरी हा रोज शेतात जाऊन धान्य पिकवत असतो त्यामुळे जगाची अन्नाची चिंता मिटत असते. पण नेमकं याचाच परिणाम त्याच्या डोळ्यांवर होत असतो. आत्ता पेरणीच्या काळात आणि पुढे कापणीच्या काळात ऊन-पाऊसाचा खेळ सुरु असतो. उन्हात जर शेतकरी बांधव बाहेर पडत असेल तर मात्र त्यांनी दुपारचं ऊन टाळावं. किमान स्वतःचा चेहरा झाकून नक्कीच घ्यावा. जरी या महिन्यांमधील ऊन हे मे महिन्यातील उन्हासारखं प्रखर नसलं तरी सूर्यकिरण डोळ्यात जाऊन डोळ्यांचं आरोग्य नक्की धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे अगदी दुपारच्या वेळेस सूर्याकडे बघणं नक्की टाळावं.

२) शेतात काम करत असताना एखादा कीटक डोळ्याला स्पर्शून जाणे किंवा एखादी वस्तू डोळ्याला इजा करणे या घटना अगदी सर्रास घडत असतात. अशावेळेस डोळा चुरचुरणे, लाल होणे किंवा त्यातून पाणी वाहायला लागणे असं होऊ शकते. अनेकदा ही लक्षणे आपोआपच बरी होतात. त्यामुळे अशी कोणतीही घटना घडली तर आधी बाजूला जाऊन डोळे मिटून बसा. हात स्वच्छ पाण्याने धुवून मग हलक्या हाताने डोळ्यावर थंड पाणी मारा आणि डोळा पुन्हा हलका बंद करून बाजूला बसा. डोळे जोरात चोळणे इत्यादी प्रकार अजिबात करू नका.

३) शेतात काम करत असताना हात सहज डोळ्याकडे जाण्याची शक्यता असते. हाताला लागलेली माती डोळ्यात जाणे किंवा जर शेतात खतांची फवारणी होत असेल तर तो डोळ्यात उडून जाणे हे प्रकार अगदी सर्रास आढळतात. मुख्यतः खतांची फवारणी करताना शक्य झाल्यास डोळ्यांवर चष्मा वापरावा आणि ते शक्य नसल्यास अत्यंत काळजीपूर्वक खतांची फवारणी करावी. तरीपण जर डोळ्यात काही गेले असं जाणवलं तर डोळे स्वच्छ पाण्याने धुवत रहा आणि तरीही जर डोळ्यांची चुरचुर थांबली नाही तर मात्र डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

४) शेतकरी बांधवांनी नियमितपणे जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन वयाच्या चाळिशीनंतर स्वतःच्या डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. डोळ्यांना अंधुक दिसतंय, डोळे सारखे लाल होत आहेत, डोळे कोरडे पडत आहेत, डोळ्यांना दोन दोन प्रतिमा दिसत आहेत अशी जर लक्षणे आढळली तर मात्र तात्काळ जवळच्या सरकारी किंवा खाजगी डॉक्टरकडे जाऊन डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. कारण ही लक्षणं काचबिंदू, मोतीबिंदूची असू शकतात.

 जगाच्या अन्नदात्याचे डोळे उत्तम असणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वरील काळजी जरूर घ्या. 

डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/

कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6

Highest reaction score.