
काही दशकांपूर्वी चाळीशीचा चष्मा ही खूपच कॉमन गोष्ट होती. पण त्या आधी सहसा चष्मा लागत नसे. पण आता मात्र दहाव्या वर्षीच चष्मा लागण्याचं प्रमाण वाढायला लागलं आहे. आणि चाळिशीच्या आधीच चष्मा असणाऱ्यांचं प्रमाण देखील वाढत आहे. आज माणसाचं सर्वसाधारण आयुर्मान हे वाढलं आहे त्यामुळे चाळीशी हा आयुष्याचा मधला टप्पा झाला आहे. पण तरीही शरीर हे चाळीस वर्षांचं होणं म्हणजे शरीर स्वतःची विशेष काळजी घ्या हे सांगायला लागतं, त्यामुळे आधीच्या ४० वर्षात शरीराची जितकी काळजी घेतली नसेल तितकी आता घ्यायला हवी. आणि त्यात डोळे हा खूप महत्वाचा घटक आहे हे अजिबात विसरू नका.
१) वाढत्या वयात डोळ्यांशी संबंधित समस्या दिसून येत असतात. अशी एक समस्या म्हणजे ‘प्रेसबायोपिया’ असून ज्यात, वस्तूला जवळून, लांबून पाहण्यात अडचण निर्माण होत असते. ह्यासाठी वर्षातून दोनदा नियमित डोळ्यांची तपासणी करून घ्या. खरंतर वयाच्या ह्या टप्प्यानंतर एकूणच सर्व आवश्यक चाचण्या ह्या वर्षातून एकदा करून घ्याव्यात आणि डोळे, नाक, कान ह्यांची तपासणी वर्षातून दोनदा करून घ्यावी
२) एका अभ्यासानुसार कोरड्या डोळ्यांची समस्या असलेल्यांची संख्या 2030 पर्यंत शहरी भागात साधारणत: 40 टक्क्यांपर्यंत असेल. ह्याची कारणं इतर अनेक आहेत, पण मोबाईल, लॅपटॉप, इत्यादींच्या स्क्रीनचा वापर आवश्यक तेवढा ठेवता आला तर उत्तम. त्यातही मुख्यतः रात्रीच्या वेळेस, अंधारात किंवा चालत्या वाहनांमध्ये स्क्रीन बघणं टाळा
३) शरीराला किमान ७ ते ८ तासांची झोप द्या. रोज पुरेशी झोप घेतल्याने आपले डोळे ‘हायड्रेड’ राहतात. अपूर्ण झोपेमुळे डोळे कोरडे व लाल होण्याचा धोका असतो. त्यामुळे पुरेशी झोप आवश्यक आहे. सोबतच आपण झोपतो त्या वेळी आपले संपूर्ण शरीर, अवयव यांना ‘रिकव्हर’ होण्यास पुरेसा वेळ मिळत असतो. त्यामुळे डोळ्यांची कार्यक्षमता अधिक सुधारत असते. डोळ्यांमधील लुब्रिकेशनसोबतच पेशी, आणि नसांची कार्यप्रणालीमध्ये सुधार होतो.
४) डोळ्यांना आणि शरीराला पुरेसा व्यायाम द्या. मागील लेखांमध्ये आपण डोळ्यांच्या व्यायामाबद्दल माहिती दिली आहे. ते व्यायाम नियमित करा. डोळ्यांवर हलक्या हाताने थंड पण स्वच्छ पाण्याचे हबकारे मारणं, डोळ्यांवर थंड दुधाच्या घड्या ठेवणं हे जरूर करा.
५) सकस आहार हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी रोज सकस आहार घेणे आवश्यक आहे. त्यात ‘अ’ जीवनसत्वाचा समावेश करावा. पपई, पालक आदींमध्ये मुबलक प्रमाणात ‘अ’ जीवनसत्व व ल्यूटिन असते. त्यासोबत हिरव्या पालेभाज्या तसेच माशांचाही आपल्या आहारात समावेश करावा. डोळ्यांसाठी पोषक आहार कोणता ह्याबाबत ह्या सदरात जे लेख लिहिले आहेत ते जरूर वाचा.
६) मेडिटेशन, प्राणायम, इत्यादी प्रकारांनी मन शांत राहील, मानसिक आरोग्य उत्तम राहील हे जरूर पाहा. कारण मनाच्या अशांततेचा परिणाम जसा इतर अवयवांवर होतो तसा तो डोळ्यांवर पण होत असतो.
आणि ह्या इतकंच महत्वाचं म्हणजे. डोळ्यांची कोणतीही छोटीशी जरी समस्या आढळली तरी तात्काळ डॉक्टरांची भेट घ्या.