
ऍस्टिग्माटिझम किंवा दृष्टिवैषम्य हा अगदी सर्रास नाही तरी बऱ्यापैकी लोकांमध्ये आढळणारा डोळ्याचा आजार आहे. इंडियन ऑप्थलमॉलॉजी असोसिएशनच्या एका अभ्यासानुसार भारतात १०० लोकांमागे ३० लोकांना हा त्रास आहे. जगातील अनेक देशांमध्ये देखील प्रमाण हे इतकंच आहे. फक्त हा आजार उपचारांनी बरा होऊ शकतो. त्यामुळे हा आजार म्हणजे नक्की काय होतं, त्याची लक्षणं कोणती आणि त्यावरचे उपाय समजून घेऊया.
डोळ्याच्या बाहुलीचा पडद्याचा आकार जो अर्धगोलाकार असतो तो तसा नसून अंडाकृती होतो तेंव्हा जवळच किंवा लांबचं सुद्धा धूसर दिसू लागतं, याला ऍस्टिग्माटिझम म्हणतात.
या आजाराची लक्षणे
१) धूसर दिसणे
२) डोळ्यांवर सारखा ताण येणे
३) सारखं डोकं दुखणे
४) रात्री कमी दिसणे
५) तिरळेपणा
यापैकी कोणतीही लक्षणे आढळली तर ऍस्टिग्माटिझम असण्याची शक्यता असू शकते. अर्थात ही सगळी लक्षणे ही डोळ्याच्या इतर आजारांची पण कारणं असू शकतात, त्यापैकी ऍस्टिग्माटिझम असू शकतो. त्यामुळे वरीलपैकी कोणतंही लक्षण आढळलं तर डोळ्यांच्या डॉक्टरांना जरूर भेट द्या. मुख्यतः लहान मुलांच्या बाबतीत या आजराची कोणतीही लक्षणं असली तरी त्यांना सांगता येत नाही, त्यामुळे त्यांचे डोळे जन्मानंतर ६ महिन्यांनी डोळ्यांच्या डॉक्टरकडे नेऊन दाखवून घ्याच.
उपाय
१) डोळ्याच्या बुबुळाच्या पडद्याच्या आकाराला साजेशा लेन्सेस आता उपलब्ध झाल्या आहेत, त्यामुळे लेन्सेसचा चष्मा वापरून या आजारातील त्रासापासून सुटका करून घेता येऊ शकते.
२) सध्या या आजाराच्या त्रासापासून सुटका देणाऱ्या कॉन्टॅक्ट लेन्सेस देखील उपलब्ध आहेत. पण या कॉन्टॅक्ट लेन्सेस जर दीर्घकाळ वापरल्या तर डोळ्यांना इन्फेक्शन होऊ शकते, म्हणून कॉन्टॅक्ट लेन्सेस हा उपाय जरी असला तरी त्याचा वापर कमीत कमी करा.
३) या पडद्याचा आकार अचूक आणण्यासाठी काही शस्त्रक्रिया देखील आता करता येणे शक्य आहे. अर्थात प्रत्येक डोळ्याची अशी शस्त्रक्रिया करणं शक्य असेलच असं नाही, त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्यानेच अशी शस्त्रक्रिया करावी.
थोडक्यात हा आजार जरी गंभीर नसला आणि यावर उपाय करणे सहज शक्य असलं तरी डॉक्टरकडे योग्य वेळेत जाणे हाच या आजराच्या त्रासापासून मुक्त होण्याचा सगळ्यात सोपा उपाय.