
मधुमेह हा आजार आता जवळपास सगळ्यांना माहीत असलेला आजार झाला आहे आणि दुर्दैव असं की ह्या आजाराचं प्रमाण वाढत आहे. आयसीएमआरच्या २०२३ च्या एका अभ्यासानुसार भारतात जवळपास १० करोड लोकं ही मधुमेहाने त्रस्त आहेत आणि ह्या आजाराचं प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे. आज जगातील मधुमेह्ग्रस्त देशांमध्ये भारताचं स्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हा असा एक आजार आहे जो पूर्णपणे बरा होत नाही, पण हा शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम करू शकतो. त्यात डोळे हा शरीराचा असा एक नाजूक अवयव आहे ज्यावर मधुमेहाचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मधुमेहामुळे डोळ्यांच्या होणाऱ्या नुकसानाकडे अतिशय गंभीरपणे बघितलं पाहिजे.
मधुमेहामुळे ‘डायबेटिक रेटिनोपॅथी’, मोतीबिंदू आणि ग्लुकोमा हे डोळ्यांचे आजार होऊ शकतात. ह्यासाठी रक्तातील साखरेचं प्रमाण हे नियंत्रणात राहील हे पाहणं अतिशय आवश्यक आहे.
मधुमेहींनी कोणत्या लक्षणांकडे लक्ष द्यायला हवं
१) कधीकधी मधुमेहींना काही दिवसांसाठी थोडंसं अंधुक दिसतं आणि पुन्हा त्यांची दृष्टी पूर्ववत होते. अशावेळेस हे अंधुक दिसणं तात्कालिक आहे असं समजून रुग्णांकडून दुर्लक्ष केलं जातं. ही चूक करू नका. अशी लक्षणं आढळली तर तात्काळ डोळ्यांच्या डॉक्टरकडे धाव घ्या.
२) मधुमेहाच्या सुरुवातीच्या अवस्थेत सुद्धा डोळ्यांना इजा पोहचू शकते, त्यामुळे डोळ्यातून सतत पाणी येणे किंवा अंधुक दिसणं असं जाणवलं तरी तात्काळ डायबेटिसच्या चाचण्या करून घ्या आणि डोळ्यांच्या डॉक्टरना डोळे दाखवून घ्या कारण मधुमेहाच्या अगदी सुरुवातीच्या अवस्थेत सुद्धा डोळ्यांच्या पेशींची हानी होऊ शकते
३) वर म्हणल्याप्रमाणे मधुमेह हा ग्लुकोमाला कारणीभूत ठरू शकतो. अचानक दिसेनासं झालं किंवा डोळ्यांची दृष्टी अचानक खूप कमी झालं तर ह्याला कारणीभूत मधुमेह असू शकतो हे विसरू नका.
४) जर तुम्हाला लहान वयात मोतीबिंदू आला असेल तर तुम्हाला मधुमेहाची लागण झाली असण्याची शक्यता आहे, त्यावर वेळीच उपाय करा
५) मधुमेहींनी किंवा इतर कोणीही वयाच्या चाळिशीनंतर नियमितपणे रक्तातील साखरेचं प्रमाण दाखवण्याऱ्या चाचण्या करून घ्याव्यात आणि रक्तदाब देखील तपासून घेत रहावा.
६) जर डोळ्यात प्रकाश चमकून जातोय किंवा रंग दिसायला अडचण होत आहे असं जाणवलं तरी पण मधुमेहाची तपासणी करून घ्या
काय काळजी घ्या
मधुमेह हा गंभीर आजार आहे. तो होणारच नाही ह्याकडे लक्ष द्या. ह्यासाठी तुमची जीवनशैली पूर्णपणे सुधारा. नियमित ७,८ तासांची झोप, पुरेसा व्यायाम, जंकफूड न खाणं
आणि तणावमुक्त जगण्यासाठी प्रयत्नशील रहावं.
पण तरीही समजा हा आजार अनुवांशिक असेल तर तो अधिक बळावणार नाही ह्यासाठी प्रयत्न करावेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायबेटीससाठी डॉक्टर्सने दिलेली औषधं नियमित घ्या, त्यात कधीही टाळाटाळ करू नका आणि दर ६ महिन्यांनी डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन डोळे तपासून घ्या !