
खेळ आणि डोळ्यांना होणाऱ्या गंभीर दुखापती – तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण जगभरात ६ लाखाहून अधिक लोकांना कोणतातरी खेळ खेळताना डोळ्यांना दुखापत होते आणि त्यातील डोळा गमावणाऱ्यांची संख्या पण खूप जास्त आहे. अमेरिकेत तिथल्या इंटेन्सिव्ह केअर युनिट्समध्ये दर १३ मिनिटाला एक व्यक्ती खेळताना डोळ्याला झालेल्या दुखापतीमुळे भरती होत असतो. र्व डोळ्यांच्या दुखापतींपैकी १०% ते २०% दरम्यान खेळ खेळणे जबाबदार असते. खेळांमध्ये डोळ्यांना दुखापत होण्याचे प्रमाण मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. आपल्या देशात खेळाशी संबंधित डोळ्यांच्या दुखापतींची अचूक आकडेवारी उपलब्ध नाही, पण आपल्या देशांत पण ह्या पद्धतीच्या दुखापतींचं प्रमाण मोठं आहे.
आपल्याकडे खेळताना होणाऱ्या दुखापतींमध्ये मुलांच प्रमाण अधिक आहे. मुलांच्या नंतर एकूणच सैन्यदलातील जवानांमध्ये हे प्रमाण जास्त आढळतं. तिथे खेळ खेळणं हा दैनंदिन जीवनाचा भाग आहे त्यामुळे तिथे ह्या दुखापतींचं प्रमाण देखील अधिक आहे. फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, बॉक्सिंग, रॅकेट स्पोर्ट्स आणि पूर्ण संपर्क मार्शल आर्ट्स, हे सर्व सेवांमध्ये खूप लोकप्रिय आहेत, हे सर्वात सामान्यपणे डोळ्यांच्या दुखापतींशी संबंधित खेळ आहेत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की धनुष्यबाण, विटीदांडू ह्या खेळांमुळे देखील डोळ्याला दुखापत झाल्याच्या घटना आपल्या देशात खूप आहेत.
सैन्य दलांमध्ये खेळताना होणाऱ्या दुखापतींविषयी अधिक जागृती असते आणि खेळताना जवानांनी डोळ्यांची काळजी घ्यावी ह्यासाठी त्यांना कायम प्रशिक्षित पण केलं जातं आणि त्याचवेळेस त्यांना आवश्यक ते साहित्य देखील उपलब्ध करून दिलं जातं.
पण लहान मुलांच्या बाबतीत मात्र ना आपल्याकडे ना बाहेरील देशांमध्ये त्यांना खेळताना डोळ्यासारख्या नाजूक अवयवाला इजा होऊ शकते ह्याबद्दल त्यांना ना जाणीव करून दिली जाते किंवा त्यांना डोळ्यांना इजा होणार नाही अशी साधनं पण उपलब्ध करून दिली जात नाहीत. त्यात अनेकदा असं घडतं की खेळताखेळता लहान मुलांच्या डोळ्याला काहीतरी दुखापत होते, लहान मूल घरी येऊन तक्रार देखील करतं, पण घरगुती उपाय करून डोळा दुखायचा कमी झाला तर डॉक्टरकडे न नेता त्याला घरगुती उपायांवरच पालक थांबतात. हे करू नये, कारण डोळा हा अतिशय नाजूक अवयव आहे त्यामुळे अशा दुखापतींकडे दुर्लक्ष करू नये.
डोळ्याच्या दुखापतीच्या सर्वसामान्य कारणांमध्ये
१) ओपन ग्लोब इंज्युरी
२) क्लोज ग्लोब इंज्युरी
ही दोन कारणं प्रामुख्याने असतात.
ओपन ग्लोब इंज्युरीमध्ये एखाद्या धारदार वस्तूमुळे नेत्रपटलाला जखम होते
तर क्लोज ग्लोब इंज्युरीमध्ये नेत्रपटलाला फारसा धक्का लागत नाही पण डोळ्याच्या इतर भागांना चांगलीच दुखापत होते.
अनेकदा खेळताना डोळ्याला थेट दुखापत होत नाही पण कपाळावर बॉल जोरात आदळल्यामूळे डोळ्याच्या मज्जातंतूना धक्का पोहचून दृष्टीचं नुकसान होऊ शकतं.
काही वेळेला प्रखर सूर्यकिरणांमुळे देखील डोळ्यांना इजा होऊ शकते. मुख्यतः सायकलिंग करताना किंवा स्कीईंग सारख्या खेळांमध्ये जर तुम्ही योग्य गॉगल लावले नसतील तर डोळ्यांचं नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे.
खेळ हे खेळलेच पाहिजेत पण त्याचवेळेस डोळ्यांची काळजी देखील घेतलीच गेली पाहिजे. काय काळजी घ्यावी
१) कोणताही मैदानी खेळ खेळताना डोळ्यावर गॉगल शक्यतो असावा, किंवा क्रिकेटसारख्या खेळात हेल्मेट जरूर वापरावं
२) नेहमीचे गॉगल डोळ्यांचं संरक्षण करतीलच पण खेळाडूंसाठीचे विशेष गॉगल असतात ते शक्यतो वापरावेत
३) काही खेळ असे असतात ज्यात डोळ्यांना इजा होण्याची शक्यता अधिक असते. असे खेळ जर कायमस्वरूपी खेळायचे असतील तर शक्यतो डॉक्टरकडून डोळे तपासून तुमच्या डोळ्यांना तो ताण झेपणार आहे का ह्याची खात्री करून घ्यावी
४) समजा डोळ्याला खेळताना दुखापत झालीच तर स्वतः कोणताही उपचार करू नका
५) एखादी बाह्य-वस्तू डोळ्यात गेली आहे असं जाणवलं तर स्वतः ती काढायचा प्रयत्न करू नका, नेत्रतज्ज्ञाला भेटूनच ती काढा
६) दुखापतीच स्वरूप किरकोळ असेल तर थंड पाण्याने डोळा धुवा पण त्यावर ताण देऊ नका
७) दुखापतीच स्वरूप जरी किरकोळ असलं तरी डॉक्टरना दाखवून घ्या आणि डोळ्याला शक्यतो आराम द्या
लक्षात ठेवा डोळा हा शरीरातील सर्वात नाजूक आणि महत्वाचा अवयव आहे, त्याला दुखापत होईल असं काहीही करू नका.