
आता कडक उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. आणि किमान महाराष्ट्रात तरी जून च्या पंधरा तारखेपर्यंत पहिला पाऊस पडेपर्यंत वातावरण हे कायम उष्ण असतं, सर्वत्र धूळ असते अशावेळेस त्याचे शरीरावर तर परिणाम होतातच पण त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर देखील होतो. त्यामुळे ह्या ऋतूमध्ये डोळ्यांची नीट काळजी घेणं आवश्यक आहे. उन्हाळा टाळता येणं शक्य नाही पण डोळ्यांची योग्य काळजी घेऊन हा ऋतू डोळ्यांना आनंददायक असेल हे बघणं मात्र नक्कीच शक्य आहे. ह्यासाठी काही महत्वाच्या टिप्स
१) चांगल्या सनग्लासेसचा (गॉगलचा) उपयोग करा. त्वचेचे सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून रक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर केला जातो. त्याच प्रकारे आयग्लास लेन्स (डोळ्यांचा चष्मा) वापरल्याने हे अल्ट्राव्हायोलेट किरण डोळ्यांना इजा पोहोचवू शकत नाहीत.
२) विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांत डोळ्यांच्या चारही बाजूंनी संरक्षण देणारा गॉगल फायदेशीर ठरतो. असा गॉगल सूर्यकिरण आणि धुळीपासून डोळ्यांना वाचवतो आणि डोळे थंड ठेवण्यासही मदत करतो.
३) उन्हाळ्यात सगळ्यांना पोहायला आवडते, पण पोहताना डोळ्यावर जरूर गॉगल घाला कारण पाण्यातील क्लोरीनने डोळ्यांची चुरचुर होऊ शकते.
४) उन्हाळ्यात फक्त त्वचाच कोरडी होत नाही, डोळे सुद्धा कोरडे पडतात. त्यामुळे या दिवसांत ‘ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप्स’ डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात.पण हे आयड्रॉप्स स्वतःच्या मनाने विकत न घेता, ते डॉक्टरांच्या सल्लाने तुमच्या डोळ्याला योग्य असतील असेच घ्या
५) डोळ्यांवर थंड पाण्याच्या किंवा थंड दुधाच्या घड्या ठेवा किंवा डोळ्यांवर काकडीचे काप ठेवल्यास डोळ्यांची आग कमी होऊ शकते
६) उन्हाळ्यात घामावाटे शरीरातून पाणी निघून जाण्याचं प्रमाण खूप असतं, त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची भीती अधिक असते, त्यामुळे पाणी, नारळपाणी, ताक, घरगुती सरबतं ह्याचं प्रमाण आहारात जरूर वाढवा.
७) स्वच्छ पाण्याने दिवसातून किमान तीनदा डोळे स्वच्छ धुवा आणि सुती कपड्याने ओले डोळे हलक्या हाताने टिपून घ्या
८) उन्हाळ्यात डोळ्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते त्यामुळे आहारात डोळ्यांना उपयोगी अशा व्हिटॅमिन अ चं प्रमाण आहारात वाढवा. मुळातच आपल्याकडचा आहार ह्या त्या ऋतूनुसार ठरवला गेला आहे. उदाहरणार्थ ह्या ऋतूत आंबा हा सर्वत्र मुबलक प्रमाणात आढळतो. आंब्यात अ जीवनसत्वाचं प्रमाण अधिक आहे जे शरीराला आणि अर्थात डोळ्यांच्या आरोग्याला आवश्यक आहे. त्यामुळे आहारात ह्या ऋतूत मिळणारी फळं मुबलक प्रमाणात खाल्ली तरी डोळ्यांचं आणि पर्यायाने शरीराचं आरोग्य नीट राहू शकतं.
९) शक्य असेल तर भर उन्हाच्या वेळेस घराबाहेर पडणं किंवा डोळ्यांचा थेट सूर्यप्रकाशाशी संबंध येणार नाही हे जरूर पहा.
ही काळजी घेतली तर हा उन्हाळा डोळ्यांना नक्कीच आल्हाददायक ठरेल